(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गावरील लोवले ग्रामपंचायत हद्दीत रामविलास भालू पासवान यांच्या भंगार साठ्याला रविवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आयशर ट्रक, प्लास्टिक प्रेस मशीन, मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक भंगार आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत एकूण ३१ लाख ३५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन बंबांना तब्बल ५ ते ६ तास प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लोवले येथील विस्तीर्ण जागेत साठवून ठेवलेल्या भंगाराला आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात दूरवर पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन अग्निशमन बंबांच्या मदतीने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोवले येथील ग्राम महसूल अधिकारी संदेश घाग यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच भंगार साठ्याचे मालक रामविलास पासवान यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. पंचनाम्यानुसार, आगीत ४ लाख रुपये किमतीचा एमएच-०८-एच-१५५६ क्रमांकाचा आयशर ट्रक आणि ४ लाख रुपयांची प्लास्टिक प्रेस मशीन जळून खाक झाली. याशिवाय १२ लाख रुपये किमतीचे ६० टन प्लास्टिक भंगार आणि ३ लाख रुपये किमतीचे अतिरिक्त १० टन प्लास्टिक भंगार आगीत नष्ट झाले.
आगीत ३ लाख रुपयांचे २ टन लोनावक कोकण, २ लाख ५० हजार रुपयांचा लोखंडी पत्र्याचा शेड, १ लाख ५० हजार रुपयांची ग्राइंडिंग मशीन, ६० हजार रुपयांचे प्लास्टिक प्रेस बंडल, ५० हजार रुपयांचे लोखंडी पत्र्यांचे भंगार आणि २५ हजार रुपयांचा बोरिंग पंप यांचेही नुकसान झाले. ग्राम महसूल अधिकारी संदेश घाग यांच्या अहवालानुसार, आगीत एकूण ३१ लाख ३५ हजार रुपयांची मालमत्ता जळून नुकसान झाले आहे.
आगीची झळ नजीकच्या रहिवासी घराला बसली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची नोंद घेण्यात आली असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.


