(लांजा / रत्नागिरी)
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर निर्माण झालेल्या वाहतूक आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवरून लांजा तालुका संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसील कार्यालय, एसटी डेपो, उपशेट्येवाडी तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अंडरपास उभारण्याच्या मागणीसाठी समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २५ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत संघर्ष समितीचे प्रतिनिधी चंद्रकांत परवडी यांनी समितीची भूमिका स्पष्ट केली. चौपदरी महामार्गामुळे शहराच्या दोन्ही बाजूंतील संपर्क विस्कळीत झाला असून नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः तहसील कार्यालय, एसटी डेपो, लांजा हायस्कूल परिसरात अंडरपासची सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला चंद्रकांत परवडी यांच्यासह सुधाकर कांबळे, प्रकाश लांजेकर, बबन मयेकर, वसंत घडशी, नाना मानकर, मोहन तोडकरी, अभिजीत राजेशिर्के, भाई चौगुले, अल्लाउद्दीन नेवरेकर, बाबा धावणे, दाजी गडहिरे, सुरेश करंबेळे आणि अन्य नागरिक उपस्थित होते. अंडरपासचा प्रश्न तातडीने मार्गी लावून विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
लांजा हायस्कूलसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना दररोज महामार्ग ओलांडावा लागतो. भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताची जोखीम टाळण्यासाठी अंडरपास ही आता गरज नसून अपरिहार्यता बनली असल्याचे संघर्ष समितीने नमूद केले. तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या तालुकाभरातील नागरिकांना महामार्ग ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
‘हा लढा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी’
लांजातील जागरूक नागरिकांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या लांजा तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून अंडरपासच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक हितासाठी उभारण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले. दरम्यान, २५ जूनपर्यंत अंडरपास उभारणीबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून जनआक्रोश व्यक्त करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा समितीने दिला आहे.

