( संगमेश्वर /प्रतिनिधी )
संगमेश्वर येथे भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत संस्कार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बौद्धाचार्य मार्गदर्शन मेळावा आणि सनद नूतनीकरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सम्यक सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या मेळाव्यास जिल्हाभरातील बौद्धाचार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संस्कार विभाग प्रमुख तथा उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन व त्रिशरण पंचशील ग्रहणाने करण्यात आली. त्यानंतर मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन जाहीर करण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांचे संस्कार विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मेळाव्यात विधीसंस्कारातील बदल, आधुनिक काळातील बौद्धाचार्याची भूमिका आणि समाजाप्रती जबाबदाऱ्या या विषयांवर आद. अनंत सावंत गुरुजी, सचिव, संस्कार विभाग महाराष्ट्र राज्य यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात परंपरा आणि वर्तमान यांचा समतोल साधत बौद्धाचार्यांनी समाजात आदर्श निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
दि. बौद्धिस्ट सोसायटीची वाटचाल, संघटनात्मक विस्तार आणि सद्यस्थितीतील घडामोडी याविषयी आद. एन. बी. कदम, महासचिव यांनी सखोल आणि विचारप्रवर्तक विवेचन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून संस्थेच्या कार्याचा व्यापक पट उलगडला. यावेळी तालुका अध्यक्ष आद. राहुल मोहिते यांनी मनोगत व्यक्त करत संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित केली. अध्यक्षीय समारोपात विजय जाधव यांनी ‘बौद्ध जीवन संस्कार पाठ’ या पुस्तकानुसार विधीसंस्कार काटेकोरपणे पार पाडण्याचे आवाहन केले. आदर्श बौद्धाचार्य घडविणे हे संस्थेचे ध्येय असून, प्रत्येकाने आचारसंहितेचे पालन करून धम्मप्रसारात सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ यांनी केले. मेळाव्यास प्रदीप जाधव, विजय कांबळे, विकास पवार, तानाजी कांबळे, के. टी. गायकवाड, सुधीर जाधव, अरुण मोरे, विद्याधर कदम, दिलीप वासनिक, महेंद्र जाधव, ज. भा. कदम, प्रकाश कांबळे, अशोक मोहिते, महावीर कांबळे, संजय कांबळे, प्रितम सावंत यांच्यासह सुमारे २०० बौद्धाचार्य उपस्थित होते. शरणत्तेय ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमातून बौद्धाचार्यांच्या वैचारिक आणि संघटनात्मक बांधिलकीला नव्याने अधोरेखित करण्यात आल्याचे दिसून आले.

