( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी, मालगुंड या नामांकित शैक्षणिक संस्थेचा ८६ वा वर्धापन दिन १० ऑक्टोबर रोजी ‘विद्यार्थी शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री. बंधू मयेकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका अनुभवण्याची संधी देणारा अभिनव उपक्रम संस्थेच्या मालगुंड, जाकादेवी आणि काजुर्ली येथील शाळांमध्ये राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कै. डॉ. दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची जबाबदारी उत्साहाने सांभाळली. कुमार तेजस रमेश देसाई याने मुख्याध्यापकपदाची, तर कु. तनया प्रवीण मोहिते हिने पर्यवेक्षिकेची भूमिका पार पाडली. कु. वनराज चंद्रकांत साळवी याने इयत्ता आठवीच्या वर्गशिक्षकाची, कुमारी पायल प्रशांत साळवी हिने इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिकेची, तर कुमारी ईश्वरी सुभाष वेले हिने इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिकेची जबाबदारी स्वीकारली. या विद्यार्थ्यांनी दिवसभर विविध विषयांचे अध्यापन करून शिक्षक म्हणून आपली भूमिका यशस्वीपणे निभावली.
विद्यार्थ्यांना अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि शिक्षकांच्या कार्याची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांना शिकवताना घ्यावी लागणारी मेहनत, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आणि शिस्तीचे महत्त्व यांचा अनुभव विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळाला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले अध्यापन कौशल्य आणि आत्मविश्वास दाखवून दिला.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त चेअरमन श्री. बंधू मयेकर तसेच जाकादेवी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अरुण कांबळे, श्री. संतोष सनगरे आणि श्री. वैभव खानोलकर यांनी काजुर्ली प्रशालेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. प्रशालेच्या एकूण शैक्षणिक कार्याचे तसेच मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकाची भूमिका पार पाडताना आलेले अनुभव, शिक्षकांच्या कार्याविषयी वाटणारा आदर आणि अध्यापनासाठी घ्याव्या लागणाऱ्या मेहनतीची झालेली जाणीव याबाबत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. आशिष घाग, सहाय्यक शिक्षिका श्रीम. परविन तडवी, सौ. वर्षा पवार, सौ. पल्लवी महाडिक, श्रीम. वैष्णवी पावरी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव विकसित करण्यासोबतच शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण करणारा ठरला.


