(रत्नागिरी / प्रतिनिधी)
काही दिवसांपुर्वी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर जीवघेण्या स्वरूपातील हल्ला झाला होता. हा हल्ला कोणी केला याबाबत पोलीसांकडून तपास सुरू आहे. मात्र विद्यमान आमदार यांच्यावर Atrocity Act अंतर्गत गुन्हा नोंदविणे आणि जिल्हाध्यक्ष यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विद्यमान आमदार यांना त्वरित अटक करणे अशा दोन प्रमुख मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. तशी माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे.
प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक १२/११/२०२४ रोजी चिपळूण येथे विद्यमान आमदारांविरोधात आंदोलन करण्यात आले. (सविस्तर माहिती सोबत जोडत आहे.) त्याचा राग मनात ठेवून विद्यमान आमदार श्री. आमदार भास्कर जाधव (गुहागर मतदार संघ) यांनी घडवून आणलेल्या दिनांक १७/११/२०२४ रोजीच्या नरवण येथील उ.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. अण्णा जाधव यांच्यावर भ्याड जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. तो हल्ला होत असताना हल्लेखोर असे म्हणत होते की, तु खूप उछलतो, खूप भाषणं करतो व शेठ ला बोलतो का? असे म्हणत हल्ला करण्यास सुरुवात केली.
तसेच नमूद आमदारांनी चिपळूणच्या आंदोलनानंतर केलेल्या प्रचारातील भाषणात व मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानुसार संशयाची सुई नमूद आमदारांकडे जाताना दिसते. सदरील हल्ला हा एकट्या अण्णा जाधवांवर नसून बहुजनांवर झालेला हल्ला आहे. तरी त्या विरोधात दिनांक १२/१२/२०२४ रोजी सकाळी १०:३० वा. स्थळ-गुढे फाटा ते बहादूर शेख नाका चिपळूण येथून डी. वाय.एस.पी. (पोलिस उपविभागीय अधिकारी, चिपळूण) यांच्या कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कारण विद्यमान आमदारांनी केलेल्या अन्याय विरोधात सदरील मोर्ध्यामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
मोर्चासाठी वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची दाट शक्यता
निवडणुकीचा काळ सुरू असताना महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यासह अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले झाले. यावेळी युथ आयकॉन सूजात आंबेडकरांनी निवडणुका होऊन जाऊदे आम्हीही उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. या नियोजित मोर्चामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर किंव्हा प्रदेश अध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर हजर राहून मोर्चाची नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे.