(रत्नागिरी)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे यांनी ग्राहक कायद्यातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात देशात प्रथम क्रमांक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना बेंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU) च्या पदवीदान समारंभात सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत यांच्या हस्ते त्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र आणि पदविका प्रदान करण्यात आली. या वेळी सर्वोच्च न्यायालय तसेच कर्नाटक उच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती, नामवंत विधिज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते.
एक वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमात देशभरातील वकील, न्यायाधीश, आयएएस-आयपीएस अधिकारी, विधी सल्लागार, तसेच विविध सरकारी व खाजगी संस्थांतील विधी अधिकारी सहभागी झाले होते. तीन कठीण टप्प्यांतील परीक्षांमध्ये अव्वल ठरून मलुष्टे यांनी हे यश मिळवले.
त्यांच्या या कामगिरीबद्दल रत्नागिरी व सिंधुदुर्गातील वकील, ग्राहक तसेच नागरिकांतून आनंद व अभिमान व्यक्त होत आहे. या यशामुळे जिल्ह्यांच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळेल, असे मत ग्राहक वकील वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी अभिनंदन करताना म्हटले की, “ग्राहक कायद्याचे क्षेत्र केवळ न्यायव्यवस्था नव्हे तर वकिली व्यवसायालाही नवे परिमाण देईल.”

