(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना समोर आली आहे. वाहन पेटवण्यापूर्वी त्याच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती असून, आगीमध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एक संशयित इसम आठवडा बाजार परिसरात आला. तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्यानंतर त्याने वाहनाला आग लावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून निघून गेला. काही वेळातच वाहनाने पेट घेतला. वाहनातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने परिसरातील नागरिकांचे या घटनेकडे लक्ष गेले. नागरिकांनी तत्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे आठवडा बाजार परिसरात काही काळ खळबळ उडाली. वाहनाला आग नेमक्या कोणत्या कारणातून लावण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य अथवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. वाहनाच्या काचा फोडून आग लावल्याचा संशय असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज तसेच उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या आगीमागील नेमके कारण आणि घटनेतील व्यक्तीची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


