(देवरुख / वार्ताहर)
पंचायत समिती देवरुख येथे झालेल्या निवृत्ती समारंभात मांडलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना आणि वाचनसंस्कृतीला चालना देण्याची मागणी चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैदेही सुधीर सावंत यांनी केली आहे.
दि. 29 एप्रिल 2026 रोजी सहाय्यक गट विकास अधिकारी विनोद कुमार शिंदे यांच्या निवृत्ती समारंभात संस्थेच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य, सभापती, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित वैदेही सावंत यांनी पुष्पगुच्छ देताना प्लास्टिक कव्हरचा वापर टाळावा तसेच पंचायत समितीमध्ये वर्तमानपत्रांची उपलब्धता सुरू करावी अशी सूचना केली होती. या सूचनेला उपस्थितांनी अनुमोदन दिले होते. मात्र अद्याप यावर अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंचायत समिती देवरुख तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्वागत कक्षामध्ये राज्य दैनिकासह जिल्हा दैनिकांपैकी किमान चार दैनिके उपलब्ध करून देण्यात यावीत, तसेच ग्रामविकास, कृषी व प्रशासकीय माहिती देणारी पुस्तके आणि मासिके ठेवण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
तसेच वाढते प्रदूषण, पर्यावरणीय बदल आणि आरोग्यविषयक धोके लक्षात घेता शासकीय कार्यालयांमध्ये प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक कव्हरवर बंदी घालण्याबाबत स्पष्ट शासन आदेश निर्गमित करावेत, अशीही त्यांची मागणी आहे.
या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाचनाची सवय वाढेल, प्रशासनाविषयी जागरूकता निर्माण होईल आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन ई-मेलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

