(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी–येरंडेवाडी येथे भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री वाडेश्वर देवाचा महाशिवरात्री महोत्सव यंदाही मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात पार पडला. श्री वाडेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित हा महोत्सव सलग ३४ व्या वर्षी यशस्वीरीत्या संपन्न झाला.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण पहिल्या दिवशी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा ठरली. गेली ३४ वर्षे सातत्याने होत असलेल्या या स्पर्धेमुळे तालुक्यासह पंचक्रोशीतील कबड्डी खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. स्थानिक खेळाचा आनंद घेण्यासाठी कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
महाशिवरात्रीच्या दिवशी श्री स्वयंभू वाडेश्वराची महापूजा, महाअभिषेक आणि सत्यनारायण पूजेसह विविध धार्मिक विधी विधिवत पार पडले. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत लहान मुले व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रात्री सुमारे १५०० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर कोकणची प्रसिद्ध लोककला ‘नमन’ सादर करून उत्सवाची भक्तीमय सांगता करण्यात आली.
या सोहळ्यास भैय्या सामंत यांनी उपस्थित राहून श्री वाडेश्वराचे दर्शन घेतले. तसेच किरण सामंत, विलास चाळके, जयसिंग माने, दिपाली जाधव, संतोष गोताड, हेमंत शिंदे, तसेच सामाजिक कार्यकर्ते विलास सुकम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
हा महोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता ग्रामस्थांच्या एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक दादा सावंत, संस्थापक अध्यक्ष (गावकर) तुकाराम येरंडे आणि व्यवस्थापक रामभाऊ मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी मंडळ सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष संदीप सावंत, उपाध्यक्ष संजय सावंत, सचिव विजय सावंत, सहसचिव अजित जुवळे, मंडळाचे सर्व सदस्य, महिला मंडळ आणि ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली.

