(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील पारपत्र (पासपोर्ट) केंद्रासाठी आवश्यक संगणक, फर्निचर आणि इतर साधनसामग्री खरेदी करण्यात आली आहे. या साहित्याचे वितरण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच पोलीस दलाला आवश्यक सुविधा आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असल्याचे डॉ. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. पोलीस ठाण्यांचे कामकाज अधिक कार्यक्षम होण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रत्नागिरी जिल्ह्यात होमगार्ड भरती, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, तसेच पोलीस दल आणि श्वान पथकासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


