[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
गणेशोत्सवानिमित्त मुंबई-पुण्यासह विविध भागांतून रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना रेल्वे स्थानकावरून पुढील प्रवासासाठी काही रिक्षाचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा शांतता समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक झाली. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या गणेशोत्सवात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी विविध विभागांनी समन्वयाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. रेल्वेने रत्नागिरीत दाखल होणाऱ्या प्रवाशांना स्थानकाबाहेर पडताच रिक्षांच्या जादा भाड्याचा सामना करावा लागू नये, यासाठी परिवहन विभागाने प्रभावी नियंत्रण ठेवावे. प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले.
गणेशोत्सव काळात शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांमुळे वाहतूक अथवा नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवावेत, तसेच पकडण्यात आलेल्या जनावरांच्या देखभाल व संवर्धनासाठी योग्य व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले. जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत आवश्यक नियोजन करण्यासोबतच ‘नो पार्किंग’ तसेच वाहतुकीसंदर्भातील महत्त्वाचे फलक नागरिकांना सहज दिसतील अशा ठिकाणी लावावेत, असेही प्रशासनाला सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षा रक्षक तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक बोटींची व्यवस्था उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जनाचे मार्ग आधीच निश्चित करून त्याबाबत आवश्यक नियोजन करण्याचेही आदेश देण्यात आले. दरम्यान, रामनाका ते विठ्ठल मंदिर या मार्गावर फळविक्रेत्यांनी उभारलेल्या हातगाड्या आणि दुचाकींच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे पादचारी व ग्राहकांना होणारा त्रास बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आला. हा मार्ग तातडीने मोकळा करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत जलद संवाद साधता यावा, यासाठी समितीच्या सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्याबरोबरच स्वतंत्र व्हॉट्सॲप समूह तयार करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. याद्वारे आवश्यक सूचना आणि माहितीची देवाणघेवाण अधिक वेगाने करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्हा शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.


