(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रतिष्ठित नागरिक व मालगुंड प्रशालेचे माजी विद्यार्थी व सध्या मुंबई येथे जी. एस. टी. अधिक्षक म्हणून काम करीत असलेले किशोर तुकाराम राऊत यांनी मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज ला एक उच्च प्रतीचा वॉटर कुलर देणगी दाखल भेट म्हणून दिला आहे.
किशोर तुकाराम राऊत हे मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज चे माजी विद्यार्थी आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी गेले. त्यानंतर ते जी. एस. टी .अधिक्षक या उच्च पदावर आज कार्यरत आहेत.
नुकतीच त्यांनी मालगुंड शाळेला भेट दिली आणि त्यांच्या लक्षात आले इथल्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासत आहे. आहे ती व्यवस्था पुरेशी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कोणताही विलंब न करता लगेच आपले वडील तुकाराम रामचंद्र राऊत यांच्या स्मरणार्थ एक उच्च प्रतीचा वॉटर कुलर भेट दिला.
एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असलेले किशोर तुकाराम राऊत हे आपली मातृभूमि आपली शाळा जिच्यामुळे आपण आज एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहोत याची जाणीव त्यांना आहे आणि याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा अतिशय उच्च प्रतीचा वॉटर कुलर भेट दिला आहे.
किशोर तुकाराम राऊत यांनी मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज ला जी वॉटर कुलर च्या माध्यमातून भेट दिली त्याबद्दल त्यांचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर यांनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे तसेच सर्व संचालक मंडळाने त्यांना धन्यवाद दिले आहेत.

