(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरात एका भंगार व्यावसायिकाकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, २ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ वाजता करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच राजापुर तालुक्यात भंगार व्यावसायिकाने सौरखांबावरील बॅटऱ्या चोरल्याचा प्रकार समोर आला होता.
याबाबत हवालदार अमोल भोसले यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, जयस्तंभ ते पेठकिल्ला परिसरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना रहाटाघर बसस्थानकासमोरील भंगार दुकानात एक दुचाकी संशयास्पद अवस्थेत दिसली. चौकशीअंती संबंधित दुकानदाराकडे दुचाकीची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी चौकशी सखोल केली असता, दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तानाजी बाबासो गोसावी (वय ४१, रा. रहाटाघर झोपडपट्टी) याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरखांबावरील बॅटऱ्या चोरीप्रकरणीही भंगार व्यावसायिक अडचणीत
२ दिवसांपूर्वीच राजापूर तालुक्यातील सोलगाव फाटा–सोलगाव रस्त्यादरम्यान सौरखांबावरील तब्बल १२ बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणीही एका भंगार व्यावसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सरपंचांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे भंगार व्यावसायिकांकडे संशयाची सुई वळली असून, जिल्ह्यातील भंगार व्यवसायच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मंदिरातील घंटांची चोरी, आणखी एक चिंतेचा विषय
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पुरातन मंदिरे ही पंचधातू किंवा पितळधातूंच्या मौल्यवान घंटांनी सजलेली आहेत. मात्र, अलीकडच्या काळात या मंदिरांमधून घंटा चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मंडणगड तालुक्यात तर, राजापूर तालुक्यातील करक येथील मंदिरातील १० ते १२ घंटा चोरीला गेल्या आहेत. या चोरीचे धागेदोरे भंगार व्यवसायाकडेच जात असल्याची चर्चाही सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
प्रामाणिक भंगार व्यावसायिकांनाही झळ
भंगार व्यवसाय आता आधुनिक साधनांनी केला जात आहे. पूर्वी पायी फिरणारे व्यावसायिक आज दुचाकी, चारचाकी वाहनांनी भंगार गोळा करताना दिसतात. काही व्यावसायिक प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, चोरीचे साहित्य भंगार दुकानांत सापडू लागल्याने प्रामाणिक व्यावसायिकांचीही बदनामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पहाटे गल्ल्यांमध्ये महिलांची संशयास्पद वावर
भंगार गोळा करणाऱ्या काही महिलांचा पहाटे गल्ल्यांमध्ये वावर वाढला आहे. या महिला बिनधास्तपणे घरांच्या कंपाउंडमध्ये शिरून लोखंडी साहित्य उचलून नेतात. किरकोळ चोरी झाल्याने बहुतेकदा तक्रार दिली जात नाही. मात्र, पोलिसांनी अशा महिलांच्या हालचालींवर देखील लक्ष केंद्रित करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.