(संगमेश्वर / एजाज पटेल)
खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाचा सुमारे ६४ हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन १५ चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील विलेपार्ले येथून रत्नागिरीकडे येणाऱ्या प्रवाशासोबत हा प्रकार घडला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दिनकर वैद्य हे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले, मुंबई येथून रत्नागिरीला जाण्यासाठी साई ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमधून प्रवास करत होते. एमएच ०३ ईएस ८८५६ क्रमांकाच्या या बसमध्ये त्यांचे लोअर सीट क्रमांक ३ होते.
१० ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास बस पेन येथे थांबली असता, वैद्य हे स्वच्छतागृहात जाऊन आले. त्यावेळी त्यांनी आपला निळ्या रंगाचा ॲपल आयफोन १५ स्लीपर सीटच्या डाव्या बाजूला ठेवला होता. जुन्या वापरातील या मोबाईलची अंदाजे किंमत ६४ हजार रुपये होती.
त्यानंतर पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास बस संगमेश्वर एसटी स्टँड येथे पोहोचली. त्यावेळी वैद्य यांना जाग आल्यानंतर त्यांनी सीटवर ठेवलेला मोबाईल शोधला; मात्र तो मिळून आला नाही. अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या उद्देशाने मोबाईल चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.


