(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे आज (११ ऑक्टोबर २०२६ ) रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार अनिकेत नारायण लाड (वय ३०, मूळ रा. पाचल, ता. राजापूर) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत प्रवास करणारे सचिन शांताराम गुरव (वय ४१, रा. निगुडवाडी, ता. संगमेश्वर) गंभीर जखमी झाले. महामार्गावरील खड्डे आणि दुचाकीचा वेग यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील रस्त्यांच्या स्थितीचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत लाड आणि सचिन गुरव हे दोघे १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री मुंबईतील भोईवाडा येथून घटस्थापनेचा सण साजरा करण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच ०३ ईई ८३५६) आपल्या मूळ गावी निगुडवाडी येथे निघाले होते. प्रवासादरम्यान ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी तुरळ येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली.
तुरळ परिसरातील महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या मार्गावरून जात असताना अचानक समोर आलेला खड्डा आणि दुचाकीचा वेग यामुळे चालक अनिकेत लाड यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर जोरात आदळली. या धडकेमुळे दोघेही रस्त्यावरील सिमेंटच्या भागावर फेकले गेले.
अपघातात अनिकेत लाड यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात सचिन गुरव हेदेखील गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक विवेक साळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी सचिन गुरव यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अभिजित मोरे यांच्या सल्ल्यानुसार १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटस्थापनेसारख्या सणासाठी मुंबईहून गावी परतणाऱ्या दोघांवर काळाने घाला घातल्याने निगुडवाडीसह मृत अनिकेत लाड यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. या अपघाताची संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची देखभाल आणि सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.


