(संगमेश्वर / एजाज पटेल)
कडवई व परिसरात कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे युवा नेतृत्व अथर्व घोसाळकर यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. सामाजिक कार्याला संघटनात्मक आणि राजकीय बळ मिळाल्यास सामान्य नागरिकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील, या भूमिकेतून त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. चिपळूण येथे आयोजित स्नेहमेलाव्यात दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
अथर्व घोसाळकर यांची कडवई व परिसरात अभ्यासू आणि संवेदनशील तरुण म्हणून ओळख आहे. शैक्षणिक, सामाजिक तसेच क्रीडा उपक्रमांमध्ये तरुणांना एकत्र आणण्याबरोबरच स्थानिक प्रश्नांवर आवाज उठविण्यात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. समाजकारण करताना काही मर्यादा येतात. मात्र, त्याला भक्कम संघटना आणि राजकीय व्यासपीठाची जोड मिळाल्यास विकासाची कामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावता येतात, या विचारातून त्यांनी भाजपचे ध्येयधोरण स्वीकारल्याचे सांगितले.
अथर्व घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे कडवई व संगमेश्वर परिसरातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या या युवा नेतृत्वाच्या निर्णयाचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.
ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश
अथर्व घोसाळकर यांच्यासोबत कडवई येथील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र घोसाळकर, अनंत कदम, सुनील करंडे तसेच शेणवडे येथील राम कदम यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचे भाजपचा गमछा घालून स्वागत केले.
‘हे कमळ माझे नाही, तर तुमचे आहे’ : प्रशांत यादव
यावेळी बोलताना भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही खचून न जाता पक्षसंघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ‘हे कमळ माझे नाही, तर तुमचे आहे. तुमची ताकद आणि तुमचा स्वाभिमान हीच आपली खरी ओळख आहे,’ असे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करताना पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याचे आवाहनही यादव यांनी कार्यकर्त्यांना केले. ‘माझ्यापेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा राष्ट्र मोठे आहे,’ हा विचार घेऊन संघटन मजबूत करण्यासाठी काम करण्याचे त्यांनी सांगितले.
अथर्व घोसाळकर म्हणाले…
पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना अथर्व घोसाळकर म्हणाले की, समाजात काम करताना वैयक्तिक पातळीवरील समाजकारणाला काही मर्यादा येतात. सामान्य नागरिक, तरुण आणि परिसराच्या विकासाशी संबंधित प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी भक्कम संघटनेची साथ आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेण्याची भूमिका यामुळे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव तसेच तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांना सोबत घेऊन लोकसेवेचे काम अधिक जोमाने पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्यास तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अथर्व घोसाळकर यांच्यासह ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे कडवई, शेणवडे आणि संगमेश्वर तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक कामाला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

