(देवरुख / सुरेश सप्रे)
जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून प्रबोधन प्रसारक शिक्षण संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली, देवरूख येथे शिक्षण घेत असलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थी कु. वाहिब मोअज्जम कडवईकर याचा सन्मान करण्यात आला.
बी. फार्मसीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. कडवईकर याला एनएबी (NAB) चिपळूणतर्फे पांढरी काठी प्रदान करण्यात आली. तसेच, एनएबी नाशिकतर्फे दिला जाणारा ‘आदर्श विद्यार्थी गौरव पुरस्कार’ देऊन त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
महाविद्यालयाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा आणि शासन निर्देशांचे काटेकोर पालन यामुळे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा आदर्श केंद्रबिंदू ठरत असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, प्राध्यापिका सौ. वैष्णवी नलावडे, तसेच एनएबीचे पदाधिकारी श्री. संदीप नलावडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र माने, सर्व पदाधिकारी, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी कु. वाहिब कडवईकर याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमातून समाजात दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

