(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर परिसरात शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसोबत भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी चार वाजता विसर्जनाला सुरुवात झाली. काहींनी गणरायांना डोक्यावरून तर काहींनी हातगाड्यांमधून आणि चारचाकी वाहनांतून नेले. ढोल-ताशांच्या तालावर महिलांनी फेर धरून नृत्य केले, अभंग गायन केले तर मुलांनी ढोल वाजवत मनोरे करून उत्सवाची रंगत वाढवली.
गद्रे वखारी समोरील शास्त्री नदी घाट, हनुमान मंदिर घाट, माभळे येथील हायवे जवळील घाट तसेच कोंडअसुर्डे परिसरातील शास्त्री नदीच्या तीरावर भाविकांनी साश्रू नयनांनी बाप्पांना निरोप दिला.
या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून होमगार्ड व पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर बंदोबस्त ठेवला होता. पोलीस पाटील अंगराज कोळवणकर व सुभाष गुरव यांनीही बंदोबस्तात सेवा बजावली.
गणेश विसर्जन उत्सव शांततेत आणि आनंदात पार पडल्याने नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेबद्दल समाधान व्यक्त केले.

