(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील जड वाहनांची वाहतूक घटस्थापनेच्या मुहूर्तावर तातडीने सुरू करावी, अन्यथा आपण स्वतः येऊन रस्ता खुला करू, असा स्पष्ट इशारा आमदार भैय्या सामंत यांनी दिला आहे. साखरपा येथे आयोजित समस्या निवारण सभेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे आंबा घाटातील रस्ता खचला असून, रस्त्याची एक बाजू कोसळल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे घाटातील रस्ता कोसळण्याची भीतीही कमी झाल्याचे सांगत, व्यापारी वर्गाची मागणी लक्षात घेऊन जड वाहनांसाठी आंबा घाटातील वाहतूक तातडीने सुरू करण्याच्या सूचना आमदार भैय्या सामंत यांनी बांधकाम विभागाला दिल्या.
घटस्थापनेच्या मुहूर्तावरच हा रस्ता जड वाहनांसाठी खुला करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. निर्धारित दिवशी वाहतूक सुरू झाली नाही, तर आपण स्वतः घटनास्थळी जाऊन रस्ता खुला करू, असा इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
आता घटस्थापनेच्या दिवशी आंबा घाटातील जड वाहनांची वाहतूक सुरू होणार की त्यासाठी आवश्यक कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार, याकडे वाहनधारकांसह व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.


