( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील संगमेश्वर बाजारपेठ परिसरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलाची एक मार्गीका ३१ मार्चपूर्वी सुरू करण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरल्याने गेले काही दिवस संगमेश्वर सोनवी चौक येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. आज १ मे पासून सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने या मार्गावर वाहनांची संख्या वाढवून कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा अभाव असल्याने वाहन चालक होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आणि संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
आज सकाळी सहा वाजल्यापासूनच संगमेश्वर सोनी चौकात वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. वाहनांच्या सुमारे दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते. मुंबई कडून येणाऱ्या वाहन चालकाने गुगल मॅप वर पर्यायी रस्ता शोधून आपली वाहने संगमेश्वर बाजारपेठ मार्गे आणल्याने संगमेश्वर बाजारपेठेत देखील असंख्य वाहने एकाच वेळी आल्याने वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही वाहतूक कोंडी दुपारी एक वाजला तरीही सुरूच होती. यातच आज सकाळी ५:३० च्या दरम्याने संगमेश्वर देवरुख मार्गावर बुरंबी करंबेळे दरम्यान एक जुनाट वटवृक्ष उन्मळून पडल्याने या मार्गावर देखील वाहतूक ठप्प झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुरंबी सोनवडे कुसुम मार्गे देवरुख अशा वळवण्यात आल्या. अचानक संगमेश्वर येथील वाहतूक कोंडी आणि संगमेश्वर देवरुख रोडवर बुरंबी करंबेळे दरम्यान वडाचे झाड कोसळून झालेली वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले.
संगमेश्वर ते माभळे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण असणाऱ्या कामांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. धामणी ते लांजा या भागात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची अनेक कामे पूर्ण होणे बाकी असताना टोल नाके सुरू करण्याबाबत मात्र मोठ्या हालचाली सुरू झाल्याने कामे अपूर्ण आणि टोल नाके सुरू अशी विसंगती भविष्यात पाहायला मिळणार असल्याने वाहन चालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळ वारंवार वाहतूक कोंडी होत असताना येथील एक मार्गिका ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. संगमेश्वर परिसरातील सर्व कामे पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी लागणार आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी, ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे होणारे वाढते अपघात ही बाब चिंताजनक बनली आहे. चौपदरीकरण सुरू असताना पर्यायी रस्ते (डायव्हर्जन) मातीचे बनवण्यात आले असून, त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी सर्विस रोडच तयार नसल्याचे दिसून येत आहे, तर जिथे आहेत तेही पूर्णपणे मातीचे असल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच संतप्त झालेल्या संगमेश्वर येथील स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकाने अचानक रास्ता रोको करून ठेकेदाराला वेगाने कामे पूर्ण न केल्यास पाच मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महामार्गावर ठिकठिकाणी मातीचे ढिगारे टाकलेले असून दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. बांधकाम सुरू असतानाही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. चौपदरीकरणादरम्यान संरक्षण भिंत उभारणे अपेक्षित असताना त्या कामालाही सुरुवात झालेली नाही.
आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेल्या संगमेश्वर येथील वाहतूक कोंडीमुळे वाहने अत्यंत मंद गतीने पुढे सरकत होती. वाहतूक सुरळीत करण्यास वाहतूक शाखेचे पोलीस देखील उपस्थित नव्हते. संगमेश्वर पासून शास्त्री पूल पर्यंत मुंबईच्या दिशेने तर सोनवी चौक पासून ओझरखोल पर्यंत रत्नागिरीच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. याच वाहनात शास्त्री पुल येथून सायरन वाजवत येणाऱ्या रुग्णवाहिकेला देखील मार्ग मोकळा मिळणे अशक्य झाले. संगमेश्वर ते शास्त्री पूल दरम्यान एक मार्ग ठप्प असताना मुंबईहून येणाऱ्या छोट्या वाहन चालकांनी दुसऱ्या बाजूने वाहने घातल्याने एकाच वेळी दोन्ही बाजू ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. असा आगाऊपणा करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यास वाहतूक शाखेचे पोलीस उपलब्ध नसल्याने या गोंधळात आणखी भर पडला.
संगमेश्वर ते माभळे दरम्यान उंच खोदकाम करण्यात आल्याने गावकऱ्यांसमोर ये-जा करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भर उन्हात काम सुरू असताना धूळ नियंत्रणासाठी पाणीही पुरेसे टाकले जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.दरम्यान, येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष घालून कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
सोनवी पुलाची एक मार्गिका सुरू करणे आवश्यक
सोनवी पूल येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता जन आक्रोश समितीने केलेल्या आंदोलनादरम्यान ३१ मार्चपूर्वी सोनवी पुलाची एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र आता मे महिना सुरू झाला तरी या पुलाची एक मार्ग का सुरू न झाल्याने या वाहतूक कोंडीचा वारंवार सामना करावा लागत आहे. ठेकेदाराने मंद गतीने केलेले काम आणि कामात सुरू असणारा हलगर्जीपणा याची आता थेट केंद्रीय मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि त्याला जबाबदार असणाऱ्या वर कठोर कारवाई करावी अशी संगमेश्वर वासियांची मागणी आहे .
— अमोल शेट्ये, व्यापारी संगमेश्वर

