(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार भैय्या सामंत यांनी आज (शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर) रोजी समस्या निवारण सभा घेतली. या सभेत महसूल विभाग वगळता अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांकडे आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने आमदार सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. विशेषतः पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.
दुष्काळसदृश परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्यासंदर्भातील माहिती काय आहे, अशी विचारणा आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून ठोस माहिती मिळाली नाही. ही सभा प्रामुख्याने पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याचे स्पष्ट करत, यापुढे संपूर्ण माहिती घेऊनच सभेला उपस्थित राहावे, अशा शब्दांत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडूनही अपेक्षित माहिती मिळाली नाही. मात्र, गावपातळीवर ग्रामपंचायती आणि ग्रामसेवक चांगले काम करत असल्याबद्दल आमदारांनी समाधान व्यक्त केले. गावांमध्ये पाणी अडविण्यासाठी जास्तीत जास्त बंधारे बांधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, कोणत्याही शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्याची आवश्यकता असल्यास ग्रामसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार बंधारे उभारण्याबाबत सूचना करण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही विविध तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आल्या.
शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ई-पीक पाहणीची नोंद वेळेत करावी, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा उतारा काढताना संकेतस्थळ बंद असल्याची अडचण येत असल्याचा मुद्दा मेघीचे उपसरपंच गंगाराम केसरकर यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी संकेतस्थळ तातडीने सुरू करावे आणि ई-पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर येत्या चार-पाच दिवसांत संकेतस्थळ व्यवस्थित सुरू होईल, असे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमात रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या ठेकेदारामुळे अडचण निर्माण होत असल्याचा मुद्दाही सभेत मांडण्यात आला. महामार्गाच्या कामासाठी दररोज हजारो लिटर पाण्याचा वापर होत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत ठेकेदाराला समज देऊन त्याने स्वतः मोठा बंधारा बांधावा आणि पाणी अडवून त्याचा वापर करावा, अशी सूचना संजय गांधी यांनी केली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याच्या वीजजोडण्या खंडित करू नयेत, तसेच वीजबिल थकीत असल्यामुळे नवीन मीटर जोडणीसाठी ग्रामपंचायतींना अडवू नये, अशा स्पष्ट सूचना आमदार किरण सामंत यांनी दिल्या. थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींनाही तातडीने नवीन मीटर उपलब्ध करून द्यावेत, असे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा वीजबिल थकीत असले तरी खंडित करू नये, तसेच यापुढे साडेसात एच.पी.पर्यंतच्या कृषिपंपांचे वीजबिल माफ असल्याचेही त्यांनी सांगितले. आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक तातडीने सुरू करण्याचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार भैय्या सामंत यांनी दिल्या.
या सभेला आमदार भैय्या सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांत अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार अमृता साबळे यांच्यासह पाणीपुरवठा, महावितरण, आरोग्य, वन, शिक्षण, एसटी महामंडळ, भूमी अभिलेख आणि बांधकाम विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच दाभोळे जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.


