(संगमेश्वर /प्रतिनिधी)
डिजिटल युगातही मूलभूत इंटरनेट सेवांचा बोजवारा उडाल्याचे चित्र संगमेश्वरात पाहायला मिळत आहे. Bharat Sanchar Nigam Limited (बीएसएनएल) ची ब्रॉडबँड सेवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार ठप्प होत असल्याने शासकीय कामकाज, शैक्षणिक प्रक्रिया आणि दैनंदिन व्यवहार अक्षरशः विस्कळीत झाले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली पेपर तपासणीसारखी अत्यावश्यक ऑनलाइन कामे इंटरनेटच्या या लहरीपणामुळे अडकून पडली आहेत. शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाला वेळेत काम पूर्ण करता येत नसून, विद्यार्थ्यांच्या निकाल प्रक्रियेवरही अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट पूर्णपणे बंद पडत असल्याने ‘ऑनलाइन’ व्यवस्था केवळ नावालाच उरल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सतत खंडित होणाऱ्या सेवेमुळे स्थानिक नागरिक आणि संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल होत नसल्याने बीएसएनएल प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे.
दरम्यान, या अकार्यक्षमतेचा थेट परिणाम ग्राहकांच्या विश्वासावर होत असून, अनेक वापरकर्ते खासगी इंटरनेट सेवेकडे वळण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घेत आहेत. डिजिटल सुविधांचा गजर करणाऱ्या यंत्रणांनी प्रत्यक्षात मात्र सेवा सुरळीत ठेवण्यात अपयश आल्याने, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तातडीने तांत्रिक त्रुटी दूर करून सेवा पूर्ववत करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत असून, बीएसएनएलने याकडे दुर्लक्ष केल्यास ग्राहकांचा ओघ कायमचा खाजगी कंपन्यांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

