( रत्नागिरी / प्रतिनिधी )
पावस एस.टी. स्थानक परिसरात किरकोळ वादातून रिक्षा चालकावर लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस?’ एवढ्याशा कारणावरून झालेल्या या मारहाणीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जखमी झालेला चालक आनंद प्रभाकर रांगणकर (वय ४०, रा. तांबळवाडी, पावस) हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास तो एस.टी. स्टँडवर थांबलेला असताना, समीर जगन्नाथ जाधव (वय ४२, रा. नाखरे) याने अचानक वाद घालत हल्ला चढवला. ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस?’ असे म्हणत त्याने रिक्षातील लोखंडी वस्तू रांगणकर यांच्या डाव्या डोळ्याजवळ झोडपली. एवढ्यावर न थांबता त्याने ठोसे देत छातीवर-डोक्यावर मारहाण केली. शिवीगाळ करत ‘ठार मारून टाकीन,’ अशी धमकीही दिली.
या हल्ल्यानंतर रांगणकर यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून अकरा मिनिटांनी त्यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात लेखी फिर्याद दिली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११५(२), ११२, ३१२ आणि ३५१(२) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

