(रत्नागिरी)
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब (2025) ची संयुक्त पूर्व परीक्षा ४ जानेवारीला होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. याबाबतचे परिपत्रकेही जारी करण्यात आले आहे. हीच परीक्षा २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे पुढे ढकलण्यात आल्याने अनेक परीक्षार्थी अडचणीत आले आहेत.
कारण ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान देशभरात अत्यंत महत्त्वाची UGC–NET परीक्षा (JRF / Assistant Professor / PhD पात्रता) होणार आहे. म्हणजेच दोन्ही राष्ट्रीय-राज्य पातळीच्या परीक्षा जवळपास एकाच आठवड्यात, अगदी समान तारखांना होण्याची शक्यता आहे. या दोन्ही परीक्षा एकाच आठवड्यात असल्याने त्याच्या तारखासुद्धा एकमेकांना क्लॅश होऊ शकतात. हा विचार एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी केला नाही का?? उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न एमपीएससी नेहमीच करते. दाद कुणाकडे मागायची? असा परीक्षार्थीना आता पडला आहे.
या दोन्ही परीक्षा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी करियर आणि शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. NET हा प्राध्यापक पदासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, तर MPSC राज्यातील प्रशासनाच्या सेवेमध्ये जाण्याचा मुख्य मार्ग आहे. अनेक उमेदवार दोन्ही परीक्षा देतात. वेळापत्रकात किमान दोन आठवड्यांचं अंतर असणं असा सामान्य प्रशासनिक समज आहे. पण इथे मात्र उमेदवारांच्या वेळेचा, मानसिक ताणाचा आणि तयारीचा काडीमात्र विचार करण्यात आलेला दिसत नाही.
निवडणुकीच्या मतमोजणीमुळे परीक्षा पुढे ढकलणे समजू शकते; पण राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या परीक्षेच्या वेळापत्रकाची पडताळणी न करणे पूर्णतः दुर्लक्ष आहे. NET ची तारीख आधीच जाहीर असताना एमपीएससीने त्याच आठवड्यात राज्यस्तरीय परीक्षा ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टाच आहे. हा निर्णय म्हणजे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्यासारखेच आहे. आता यासाठी दाद कुणाकडे असा प्रश्न परीक्षार्थीना पडला आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे होणारी ही परिस्थिती त्वरित दुरुस्त होणे अत्यावश्यक आहे. एमपीएससी अधिकाऱ्यांच्या या अजब कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

