(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातून ५३ वर्षीय कापड व्यावसायिक बेपत्ता झाल्याची आणि त्यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा आणि संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सज्जन अमरचंद ओसवाल (वय ५३, रा. घर क्रमांक १९१८, रामआळी, अमरसन्स गारमेंट, रत्नागिरी) असे अपहरण झाल्याची तक्रार असलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे नातेवाईक रोहित सज्जन ओसवाल (वय २७, व्यवसाय कापड व्यवसाय) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सज्जन ओसवाल हे आठवडा बाजार परिसरातील ‘यश ट्रेडर्स’ या दुकानातून चुलतभाऊ निर्मल रमेश ओसवाल यांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांचा शोध घेऊनही ते आढळून न आल्याने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून सज्जन ओसवाल यांना बळजबरीने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम जुन्या भारतीय दंड विधानातील कलम ३६३ शी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत असून, सज्जन ओसवाल यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


