( रत्नागिरी /प्रतिनिधी )
कर्ज वसुलीच्या निमित्ताने गेलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यावर संचालकासह तिघांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहराजवळील झाडगाव एमआयडीसी परिसरातील मिरजोळे येथे दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारीनुसार ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत इस्माईल वास्ता यांनी राजापूर अर्बन बँकेकडून कर्ज घेतले आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी लक्ष्मण गणू म्हात्रे व अन्य कर्मचारी कर्जदाराच्या घरी गेले होते. यावेळी वास्ता यांनी बँकेचे संचालक अल्ताफ संगमेश्वरी यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर संचालक संगमेश्वरी घटनास्थळी येताच घराच्या अंगणात कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. वाद विकोपाला गेल्याने लक्ष्मण गणू म्हात्रे यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.
व्हिडीओ पाहा: Ajit Pawar Shok Sabha | अदानी-अंबानी ते नाना पाटेकर-जरांगे… दादांच्या शोकसभेला कोण-कोण हजर?
या घटनेनंतर बँक कर्मचारी म्हात्रे यांनी तात्काळ ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून संशयित आरोपी अल्ताफ संगमेश्वरी, हिदायत इस्माईल वास्ता आणि हनीफ हिदायत वास्ता या तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चर्चेत असलेल्या बँकेची अनेक कर्जप्रकरणे वादात ?
राजापूर अर्बन बँकेची वादग्रस्त कर्जप्रकरणांची मालिका सुरू असताना पुन्हा मारहाणीच्या घटनेनंतर संबंधित बँकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच कर्जप्रकरणांमधील वाद, तक्रारी आणि ग्राहकांच्या नाराजीमुळे चर्चेत असलेली ही बँक आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. व्यवस्थापनातील समन्वयाचा अभाव, वसुली प्रक्रियेतला आक्रमकपणा आणि संवादाचा तुटलेला धागा यामुळेच परिस्थिती चिघळत असल्याची चर्चा आहे. अनेक कर्जप्रकरणे वादात असल्याची माहिती देखील आता समोर येत असताना व्यवस्थापनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे.

