(चिपळूण / प्रतिनिधी)
प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधने आणि डोळ्यांत मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न… या बळावर एका शालेय शिपायाने आपल्या मुलाला डॉक्टर बनविण्याचे ध्येय उराशी बाळगले. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे स्वप्न अखेर साकार झाले असून, चिपळूण तालुक्यातील निवळी (कोंडवाडी) येथील रमेश भाई भालचंद्र शिंदे यांचे सुपुत्र पंकज शिंदे यांनी बीएएमएस (BAMS) ही वैद्यकीय पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे शिंदे कुटुंबीयांसह संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवळी येथील शाळेत शिपाई म्हणून सेवा बजावणारे रमेश भाई शिंदे यांनी मध्यमवर्गीय परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर सोडली नाही. पत्नी सुलभा शिंदे यांनीही पतीच्या ध्येयाला खंबीर साथ दिली. पंकजने डॉक्टर व्हावे, हे या दाम्पत्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले. परिस्थितीच्या मर्यादांवर मात करीत मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आणि त्याच्या स्वप्नांना बळ दिले. पंकजने निवळी हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. घरीच अभ्यास करून त्याने मिळवलेले हे यश त्याच्या स्वावलंबी वृत्तीचे आणि अभ्यासातील सातत्याचे द्योतक ठरले. पुढे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा मनाशी बाळगून त्याने कालिदास महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. या शैक्षणिक प्रवासात आई-वडिलांसह बहीण सानिका, आजोबा भालचंद्र शिंदे आणि नातेवाइकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दीर्घ परिश्रमांनंतर पंकजने बीएएमएस ही वैद्यकीय पदवी संपादन केली आणि शिंदे कुटुंबाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. मुलाच्या या यशाने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पंकजच्या यशामागे त्याची जिद्द, मेहनत आणि चिकाटी महत्त्वाची ठरली असून, त्याच्या शैक्षणिक वाटचालीत भाई शिंदे (बुवा), हवालदार विजय राठोड तसेच नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभल्याचे डॉ. पंकज शिंदे यांनी सांगितले. पंकजच्या या यशाबद्दल मित्रमंडळींनी त्याचा छोटेखानी सत्कार करून अभिनंदन केले. दुर्गम भागातील गावांमध्ये वेळप्रसंगी, विशेषतः रात्री-अपरात्री, वैद्यकीय मदतीची गरज भासते. अशा वेळी निवळी-कोंडवाडी परिसराला आपलाच डॉक्टर उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजच्या यशाकडे केवळ एका कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीनेच नव्हे, तर स्थानिक परिसरासाठीही आशादायी पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
एका शालेय शिपायाच्या कष्टांना मुलाच्या यशाने मिळालेली ही पावती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद असल्याची भावना रमेश भाई शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ. पंकज शिंदे यांच्यावर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


