(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील कोठारेवाडी स्टॉपजवळ उतारावरील वळणावर ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. विजय मल्लिकार्जुन (वय २८, रा. कन्नूर पोस्ट, जेवगिरी, गुलबर्गा, कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (७ ऑक्टोबर) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय मल्लिकार्जुन हा केए २८ एबी ०२०७ क्रमांकाचा ट्रक जयगड येथून कर्नाटकच्या दिशेने घेऊन जात होता. कापडगाव येथील कोठारेवाडी स्टॉपजवळ उतारावरील वळणावर ट्रक आला असता, तो वेगात चालविल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी ट्रक वळणावर उलटला. या अपघातात चालकाच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला, तसेच ट्रकचेही नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपघाताची नोंद करण्यात आली. कापडगावच्या पोलीस पाटील तथा गृहिणी सौ. मग्धा दामोदर कांबळे (वय ५१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.


