(चिपळूण)
चिपळूण शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार फ्लॅट फोडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी राधाकृष्णनगरमधील नऊ फ्लॅट्स फोडल्याच्या प्रकारानंतर, शनिवारी खेंड-कांगणेवाडी आणि बायपास परिसरातील तीन अपार्टमेंटमधील चार फ्लॅट्स फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खेंड-कांगणेवाडीतील अपार्टमेंट्सवर चोरट्यांचा हल्ला
खेंड-कांगणेवाडी परिसरातील ‘हरिदर्शन’ आणि ‘लक्ष्मीवैभव’ या दोन अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली. ‘हरिदर्शन’ अपार्टमेंटमध्ये सुरेखा माईगडे यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेण्यात आले. याच इमारतीतील दिनेश सागवेकर यांच्या फ्लॅटवरही चोरीचा प्रयत्न झाला, मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
‘लक्ष्मीवैभव’ अपार्टमेंटमधील प्रमोद धामणस्कर यांचा फ्लॅट फोडण्यात आला, परंतु तेथूनही चोरट्यांना काही मिळाले नाही. याशिवाय, बायपास परिसरातील ‘द्वारका अपार्टमेंट’मध्ये प्रसन्ना जोशी यांच्या घरातून ऐवज लंपास करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांची तात्काळ कारवाई; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.