(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कमी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत नगर परिषद सतर्क झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाण्याची पातळी घटू लागल्याने भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी आतापासूनच पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून दर सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही १५ मिनिटांची कपात केली जाणार आहे. पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर उपस्थित होते.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने १० टक्के पाणी कपात करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने शीळ धरणाची पाहणी करून पाणीसाठ्याचा आढावा घेतला. शहरात सुमारे १२ हजार ५०० नळजोडण्या असून, दररोज सुमारे २० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज भासते. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास महिन्याला सुमारे ८० एमएलडी पाण्याची बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करून पाण्याचा वापर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.३२७ दशलक्ष घनमीटर आहे. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये धरण भरून वाहते. यंदा मात्र कमी पाऊस आणि प्रखर उन्हामुळे पाणीसाठ्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ९९.७३ टक्के असल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली. पाण्याची पातळी वेगाने कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संभाव्य टंचाई टाळण्यासाठी हा खबरदारीचा उपाय करण्यात आला आहे.
शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी नगर परिषदेकडून पर्यायी स्रोतांचा वापर करण्याची तयारीही सुरू आहे. पानवल धरणाची साठवण क्षमता ०.३५० दशलक्ष घनमीटर असून, पानवल ते नाचणे या मार्गावरील सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम अद्याप प्रलंबित आहे. ठेकेदाराची देय रक्कम बाकी असल्याने हे काम रखडल्याची माहिती देण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली या कामासंदर्भातील कार्यवाही लवकर पूर्ण केली जाणार आहे. देयक अदा झाल्यानंतर काम सुरू होऊन पानवलचे पाणी शहरासाठी वापरण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे.
नाचणे तलाव आणि खासगी विहिरीचाही आधार
नाचणे येथील तलावाची स्वच्छता करून त्यातील नैसर्गिक झरे मोकळे करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तलावातील पाणी वापरणे शक्य होईल. तसेच निवखोल येथील खासगी विहीर भाडेतत्त्वावर घेऊन त्यातील पाणी शहरासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शीळ येथील जॅकवेल ज्या विहिरीत कोसळली होती, त्या विहिरीची स्वच्छता करून आवश्यक बांधकाम केले जाणार आहे. त्यानंतर तेथील पाणी वापरण्याची शक्यता तपासली जाणार आहे. पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नगर परिषदेने पाणी कपातीचा निर्णय घेतला असला, तरी पर्यायी स्रोत कार्यान्वित करणे आणि प्रलंबित जलवाहिनीचे काम पूर्ण करणे यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. पाण्याची बचत करताना नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल, यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आता रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.


