(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात तांदूळ पिकाचे मोठे नुकसान झाल्याने पंजाब व हरयाणा या प्रमुख उत्पादन क्षेत्रांतील बासमती तांदळाचे उत्पादन घटले आहे. याचवेळी जागतिक बाजारपेठेत वाढलेल्या मागणीमुळे बासमतीसह विविध सुगंधित तांदळांच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे.
गेल्या सहा महिन्यांत बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी आणि परिमल या तांदळांच्या दरात सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे. या तांदळांच्या किमतींमध्ये क्विंटलमागे सुमारे १.५ ते २७.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, बासमती व सुगंधित तांदळाच्या दरात तर ७०० ते ९०० रुपयांची उसळी दिसून येत आहे. घाऊक बाजारात बासमती तांदळाचे दर ३२ ते १०० रुपयांनी वाढले असून, किरकोळ बाजारात हेच दर किलोमागे ७० ते ३०० रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. नव्या तांदळाची आवक सुरू झाली असली तरी अपेक्षेपेक्षा कमी उत्पादनामुळे दरांवर कोणताही दबाव निर्माण झालेला नाही. दरवाढीमागे उत्पादनातील घट हे प्रमुख कारण मानले जात आहे. अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे बासमती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय, बासमती बियाण्यांचा अधिक खर्च आणि दीर्घ कालावधीची लागवड प्रक्रिया यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीचे क्षेत्रही मर्यादित ठेवले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरही बासमती तांदळाची मागणी वाढत आहे. इराणसह आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून, दरवर्षी सुमारे ४० लाख टन बासमतीची निर्यात केली जाते. अलीकडील आखाती प्रदेशातील अस्थिरतेमुळे अनेक देशांनी अन्नधान्य साठवण्यावर भर दिला असून, त्यामुळे मागणीत वाढ होऊन दरांवर आणखी ताण निर्माण झाला आहे. उत्पादनातील घट आणि वाढती जागतिक मागणी या दुहेरी दबावामुळे तांदळाचे दर सध्या उच्चांकी पातळीवर पोहोचले असून, येत्या काळातही दरवाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

