( रत्नागिरी )
स्वच्छता, पर्यावरणसंवर्धन आणि शाश्वत शैक्षणिक वातावरणाला प्राधान्य देणाऱ्या स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन २०२५–२६ (SHVR) मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी शाळांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. इयत्ता १ ते ८ आणि ९ ते १२ या दोन्ही गटांमध्ये अनेक शाळांनी ‘स्टार’ मानांकन मिळवत स्वच्छतेसोबत हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील इयत्ता १ ते ८ वी शाळा
राजापूर तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा कळसवली नं. १ (UDISE: २७३२०७०७७०३) या शाळेने स्व-मूल्यांकनात १६.८० टक्के गुण मिळवत ‘स्टार’ मानांकन पटकावले. याचबरोबर जि.प. प्राथमिक शाळा भोके आंबेरकरवाडी (रत्नागिरी) आणि संगमेश्वर जि.प. शाळा ओझरेखुर्द यांनीही ‘स्टार’ रेटिंग मिळवून ग्रामीण शाळांची सकारात्मक प्रतिमा उंचावली आहे.
ग्रामीण भागातील इयत्ता ९ ते १२ वी शाळा
लांजा तालुक्यातील जगन्नाथ ग. पेडणेकर हायस्कूल (UDISE: २०३२०५०८४०३) या शाळेने ८७.२० टक्के स्व-मूल्यांकनासह सहभाग नोंदवला. तसेच दापोली येथील वेल्वी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि चिपळूणमधील वसंत शंकर देसाई हायस्कूल, असुर्डे आंबटखोल यांनीही ‘स्टार’ मानांकन मिळवत स्वच्छता व हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.
शहरी भागातील इयत्ता १ ते ८ वी शाळा
चिपळूण येथील जि.प. प्राथमिक शाळा गोवळकोट भोईवाडी (UDISE: २०३२०१००१०७) या शाळेने १०.८३ टक्के गुणांसह ‘स्टार’ रेटिंग प्राप्त केले.
शहरी भागातील इयत्ता ९ ते १२ वी शाळा
रत्नागिरी शहरातील मराठा मंदिर ग्लोबल स्कूल (UDISE: २७३२०८२०१५०) या खासगी शाळेने ८४.०० टक्के स्व-मूल्यांकन आणि ८८.०० टक्के अंतिम मूल्यांकनासह ‘स्टार’ मानांकन मिळवत शहरी शाळांमध्ये आघाडी घेतली आहे.
शिक्षण आणि पर्यावरणाचा समन्वय
या मूल्यांकनातून शाळांमधील स्वच्छता, हरित परिसर निर्मिती, पाणी व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याचे प्रयत्न ठळकपणे समोर आले आहेत. शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रत्नागिरी जिल्ह्याने SHVR २०२५–२६ मध्ये सशक्त उपस्थिती नोंदवली असून, आगामी काळात अधिकाधिक शाळा या उपक्रमात सहभागी होतील, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

