(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथे घडला होता. या घटनेनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मधुरा मनोज मेस्त्री (वय ३१, रा. सुतारवाडी, शिवार आंबेरे, ता. जि. रत्नागिरी) यांचा मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी मधुरा मेस्त्री यांचे राहत्या घरी पतीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून त्यांनी ‘रेटॉल’ हे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याचे नोंदीत नमूद आहे. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने ८ ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबईतील नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे.


