(पुणे / प्रतिनिधी)
प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) या ग्रामीण अर्थकारणाचा कणा असून, बदलत्या काळानुसार त्यांनी केवळ वित्तपुरवठ्यापुरते मर्यादित न राहता बहुआयामी भूमिका बजावली पाहिजे. बदलते तंत्रज्ञान, बाजारपेठेतील स्पर्धा आणि पर्यावरणातील बदल स्वीकारून सहकारी संस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे. यामध्येच सहकार क्षेत्राच्या यशाची गुरुकिल्ली दडलेली आहे, असे परखड मत दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.
पुणेस्थित वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात प्राथमिक कृषी संस्थांच्या व्यावसायिक विकासासाठीच्या योजनांवर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, झांबिया, गॅम्बिया आणि भारतातील निमंत्रित प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
या वेळी पटवर्धन यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या अंब्रेला टाइप सहकार विकासाच्या प्रारूपाची माहिती दिली. या प्रारूपामुळे संबंधित भागातील अर्थकारणाला मिळालेली गती आणि विकासाला झालेली चालना यांचे विविध संदर्भ देत त्यांनी त्या परिसरातील प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या यशोगाथा मांडल्या.
स्वरूपानंद पतसंस्थेने भांडवलनिर्मितीच्या क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, या प्रवासात मिळालेले यश आणि संस्थेची अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) ६३ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, याविषयीही त्यांनी सविस्तर विवेचन केले.
‘सहकारातून समृद्धी’चा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यावर भर
पंतप्रधानांनी दिलेला ‘सहकारातून समृद्धी’ हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकारी संस्थांमध्ये युवा वर्गाचा सहभाग वाढविणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार संस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत आवश्यक बदल करणे महत्त्वाचे असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. या विषयावर त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपले विचार मांडले.
आंतरराष्ट्रीय परिषदेत वक्ता म्हणून सहकारी संस्थांच्या यशोगाथा विविध देशांतील प्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करता आल्याने समाधान मिळाले. अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेली संधी ही आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी वाटचालीची पावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


