(लांजा /रत्नागिरी)
लांजा येथील आग्रे हॉल परिसरात दोन ते तीन व्यक्ती गांजाचे सेवन करीत असल्याची माहिती डायल ११२ वर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तपासणीदरम्यान गांजाचे सेवन सुरू असल्याचे आढळले नाही. उलट, कॉल करणारा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. ब्रेथ अॅनालायझर चाचणीत मद्यसेवनाची पुष्टी झाल्यानंतर, पोलिसांना जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून संबंधित तरुणाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील रवि राठोड (वय २७, सध्या रा. आग्रे हॉलजवळ, गोसावी चाळ, लांजा; मूळ रा. गौडूर तांडा, विजापूर, कर्नाटक) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५५ वाजता लांजा येथील फ्रेंड्स बिअर शॉपीजवळील परिसरात दोन ते तीन व्यक्ती गांजाचे सेवन करीत असल्याची माहिती डायल ११२ वर देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे लांजा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही बाब आढळून आली नाही. दरम्यान, माहिती देणारा सुनील राठोड हा मद्याच्या अंमलाखाली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला लांजा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्यात ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे त्याची तपासणी करण्यात आली. ७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटे ३३ सेकंदांनी करण्यात आलेल्या चाचणीत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण १९७ मिलीग्रॅम नोंदविण्यात आले. चाचणीचा अहवाल मद्यसेवन केल्याचे दर्शवित असल्याने यंत्राद्वारे त्याची प्रिंटही काढण्यात आली.
डायल ११२ वर दिलेली माहिती खोटी असल्याची जाणीव असूनही शासकीय लोकसेवकाला खोटी माहिती दिल्याचा आरोप सुनील राठोड याच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अजिज रमजान नदाफ (वय ३०, नेमणूक लांजा पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २१७(ड) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


