(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रत्नागिरी शहरातील TRP रस्त्यावर दुचाकी अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रस्त्यावर साचलेला चिखल, मातीचे थर आणि टणक खड्डे यामुळे दररोज घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. किरकोळ अपघातांकडे दुर्लक्ष होत असताना, एखादा मोठा व जीवघेणा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सकाळच्या सुमारास खडबडीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी मारत असल्याने माती अधिकच घट्ट होते. परिणामी रस्त्यावर टणक खड्डे तयार झाले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरत आहे. महामार्गाच्या काँक्रीटीकरण मार्गिकेवरूनही मोठ्या प्रमाणात माती साचून ती चिखलाच्या स्वरूपात रस्त्यावर पसरत आहे. हा चिखलमिश्रित माती बाजूला करण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीची असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. कोणतीही सुरक्षितता उपाययोजना न करता मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.
या गंभीर प्रकाराकडे महामार्ग प्राधिकरण विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र आहे. वारंवार अपघात होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ठेकेदार कंपनीला शहाणपणा कधी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्यावरील चिखल हटवणे, खड्डे बुजवणे आणि काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य सुरक्षितता उपाययोजना राबवणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा ‘अपघातानंतर शहाणपण’ हा नेहमीचा प्रकार पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

