(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात असलेल्या सुमित्रा ज्वेलर्स या सराफ दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तूंसह सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरातील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) आणि २३८ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर महादेव देवरूखकर (वय ६३), व्यवसायाने सोनार असून त्यांचे सुमित्रा ज्वेलर्स हे दुकान मारुती मंदिर परिसरात आहे. २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. त्यानंतर ३० मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटर उचकटलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे बंद शटर कोणत्यातरी कठीण हत्याराने उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील १०५० ग्रॅम वजनाचे पैंजण जोड (किंमत १ लाख रुपये), ३१० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताम्हण (किंमत ५० हजार रुपये), २०० ग्रॅम वजनाचे छल्ले (किंमत २० हजार रुपये) असा एकूण चांदीचा ऐवज लंपास केला. याशिवाय चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दुकानातील हिकव्हिजन कंपनीचा काळ्या रंगाचा डीव्हीआरही चोरून नेण्यात आला.
या चोरीत एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून, घटनेची नोंद मपोहेकॉ पाटील यांनी केली आहे. पुढील तपास सागर शिंदे करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

