(जाकादेवी / वार्ताहर)
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२५’ साठी वैभव खानोलकर लिखित ‘दशावतार : एक समृद्ध लोककला’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या या साहित्यकृतीला राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाल्याने दशावतार या पारंपरिक लोककलेच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र सारस्वत रा. वि. भावे यांनी १८९३ मध्ये स्थापन केलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेतर्फे साहित्याच्या विविध प्रकारांतील गुणवत्तापूर्ण साहित्यकृतींचा गौरव केला जातो. यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड झालेल्या ग्रंथांमध्ये वैभव खानोलकर यांच्या ‘दशावतार : एक समृद्ध लोककला’ या पुस्तकाचा समावेश आहे. खानोलकर हे रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक असून दशावतार लोककलेचे सखोल अभ्यासक आहेत.
या ग्रंथात खानोलकर यांनी दशावतार लोककलेची परंपरा आणि इतिहास, तिची रंगभूमी, कलावंत, सादरीकरणाची वैशिष्ट्ये तसेच कोकणच्या लोकजीवनाशी असलेले तिचे अतूट नाते यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. दशावतार ही केवळ मनोरंजनाची कला नसून कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि लोकजीवनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे, ही भूमिका त्यांनी या साहित्यकृतीतून मांडली आहे.
वैभव खानोलकर यांची व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असून उत्कृष्ट निवेदक म्हणूनही त्यांचा राज्यभर लौकिक आहे. विविध विषयांवरील त्यांचे चिंतनशील लेखन मौलिक ठरत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. शैक्षणिक, सामाजिक, कला, अभिनय आणि साहित्य क्षेत्रातील असंख्य मान्यवरांशी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून जोडलेले संबंधही उल्लेखनीय आहेत.
‘दशावतार : एक समृद्ध लोककला’ या ग्रंथाला मिळालेला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार हा खानोलकर यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्याबरोबरच कोकणच्या लोककलेचा आणि दशावतार रंगभूमीचा सन्मान मानला जात आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खानोलकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानोली गावचे सुपुत्र असून मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील उर्फ बंधु मयेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.


