(रत्नागिरी / वार्ताहर)
बेंगळुरू येथे ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या मास्टर्स आशियाई जलतरण क्रीडा स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी चौथा क्रमांक पटकावला.
गौरी मिलके यांच्या या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आशियाई स्तरावरील या स्पर्धेत त्यांनी आपल्या कौशल्याची छाप पाडली.
गौरी महेश मिलके या रत्नागिरी जिल्ह्यातील महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या संचालिका आहेत. त्यांच्या जलतरण प्रवासात सासरे शंकरराव मिलके आणि पती महेश मिलके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.


