(मंडणगड / रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील आंबडवे गावचे सुपुत्र तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरीचे जिल्हा सचिव (संस्कार विभाग) डॉ. अल्पेश अश्विनी अशोक सकपाळ यांना तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर (अहिल्यानगर) यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न २०२६’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि धम्मकार्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजातील विविध क्षेत्रांत मोलाचे कार्य करणाऱ्या ७५ मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये डॉ. अल्पेश सकपाळ यांचा समावेश करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ४ जून २०२६ रोजी संगमनेर, अहिल्यानगर येथे आयोजित ‘संविधान अमृत महोत्सव’ कार्यक्रमात संपन्न होणार आहे. डॉ. सकपाळ हे गेली पंधरा वर्षे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. सन २०१२ पासून त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेत विविध पदांवर काम करत संघटनात्मक कार्याला बळ दिले आहे. सध्या ते जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि पुणे जिल्ह्यांत प्रभावी प्रवचनकार म्हणून त्यांनी प्रबोधनाची चळवळ उभी केली आहे. समाजप्रबोधन, बौद्ध धम्माचा प्रसार आणि युवकांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून दापोली येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत राहून अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. धम्मकार्य, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र रत्न २०२६’ पुरस्कारामुळे मंडणगड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

