(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पाली-मराठवाडी येथे आठवडा बाजारासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १२.३० ते १.४५ या वेळेत ही घरफोडी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाक्षी अविनाश जाधव (वय ४५, रा. पाली-मराठवाडी, रत्नागिरी) या बुधवारी दुपारी भाजीपाला आणि घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी आठवडा बाजारात गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर घराच्या आतील दरवाजाची बिजागरे तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी गोदरेज कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजात पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या, सोन्याचे वळे, पांढऱ्या खड्याची अंगठी, दोन पदरी काळेमणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या वाट्या व मणी, बदामाच्या आकाराचे लॉकेट, कानातील सोन्याच्या रिंगा व वेल, नाकातील सोन्याची पिन, तसेच चांदीचे पैंजण आणि जोडवी यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ६ लाख ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मिनाक्षी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.


