(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील पाली बाजारपेठ परिसरात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या एसटी चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी एका युवकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास पाली बाजारपेठेत घडली.
फिर्यादी मनोल भानदास सोळंके (वय ३७), हे एसटीमहामंडळ अंतर्गत लांजा डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत असून त्यांना नेमून दिलेल्या एमएच-१४-एलएक्स-६९२७ क्रमांकाच्या एसटी बसवर ते कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी आनंद माणिक सोनवणे (वय २५, रा. कोंडगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे) याने कोणतेही ठोस कारण नसताना त्यांच्याशी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. शिवीगाळ करू नये, अशी समज फिर्यादींनी दिल्यानंतर आरोपी संतप्त झाला आणि त्याने सोळंके यांना बसमधून बाहेर ओढून मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावरील शासकीय गणवेशाचा शर्ट पकडून धक्काबुक्की करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३२, १२१(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकदपटशा दाखवून परावृत्त करण्याचा प्रयत्न हा गंभीर स्वरूपाचा प्रकार मानला जात असून, या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

