(विल्ये / अमित कांबळे)
सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबईच्या पाली विभागाच्या वतीने कार्ले-भाजे लेणी येथे एक दिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत मुंबईतील ५० विद्यार्थ्यांसह रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सहलीचे विशेष आकर्षण म्हणजे ६० वर्षांवरील वयस्कर विद्यार्थ्यांनीही ३०० ते ४०० पायऱ्या चढून लेण्यांमध्ये प्रवेश केला आणि प्राचीन बौद्ध वारशाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या अभ्यास सहलीत सहलप्रमुख प्रा. विनोद भेले, प्रा. विजय मोहिते, आशा उके आणि प्रा. दिलीप वासनिक उपस्थित होते. प्रा. दिलीप वासनिक हे पाली भाषा विभागप्रमुख, अभ्यासक तसेच भारतीय बौद्ध महासभा, रत्नागिरीशी संबंधित आहेत. रत्नागिरीतून आयु. प्रकाश कांबळे, अरुणकुमार मोरे, सुहास कांबळे, तानाजी कांबळे, अशोक जाधव आणि आदेश कांबळे यांनी सहलीत सहभाग घेतला.
लेण्यांच्या भेटीदरम्यान सर्वप्रथम चैत्यगृहातील स्तूपाला वंदन करून रतन सुत्ताचे पठण करण्यात आले. त्यानंतर प्रा. विनोद भेले यांनी कार्ले लेणीचा इतिहास, स्थापत्यशैली आणि बौद्ध परंपरेतील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्ले लेणीचे प्राचीन नाव ‘वारीला लेण’ असे होते. ही लेणी सातवाहन काळातील असून, तिचा इतिहास जवळपास दुसऱ्या शतकापर्यंत जातो. लोणावळ्यापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या लेण्यांमध्ये प्राचीन स्थापत्यकलेचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने पाहायला मिळतात, अशी माहिती प्रा. भेले यांनी दिली.
चैत्यगृहातील स्तूपाची रचना समजावून सांगताना त्यांनी मेदि, वेदिका, अंड, हर्मिका, यष्टी आणि छत्र या विविध भागांची माहिती दिली. स्तूपाभोवती कुंपणासारखी असलेली दगडी वेदिका, अर्धगोलाकार मुख्य भाग, मध्यभागी असलेली यष्टी आणि तिच्यावरील छत्र यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूंना असलेले अष्टकोनी स्तंभ आणि त्यांवरील शिलालेख यांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्ले लेणीतील अशोक स्तंभ, छताला आधार देणाऱ्या हत्तीच्या पाठीच्या आकाराच्या लाकडी कमानी, हत्तींची शिल्पे आणि बोधिसत्त्वाची शिल्पे यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. भिक्खूंना निवास आणि ध्यानसाधनेसाठी असलेल्या विहारांची रचना विद्यार्थ्यांनी समजून घेतली.
यानंतर विद्यार्थ्यांनी जवळच असलेल्या भाजे लेणीला भेट दिली. या लेण्यांचा कालखंड इ.स.पूर्व दुसरे शतक ते पहिले शतक असा सांगितला जातो. थेरवाद बौद्ध परंपरेशी संबंधित असलेल्या या लेणी समूहात एकूण २२ लेणी असून, त्यामध्ये चैत्यगृह आणि भिक्खूंच्या निवासासाठी विहार आहेत. भाजे लेणीतील १४ स्तूपांचा समूह अरिहंत भिक्खूंच्या नावांशी संबंधित असल्याची माहिती देण्यात आली. तसेच विहार क्रमांक १९ मधील सूर्य आणि इंद्र यांच्या प्रतिमांविषयीही विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या एक दिवसीय अभ्यास सहलीमुळे विद्यार्थ्यांना प्राचीन बौद्ध संस्कृती, लेण्यांचे स्थापत्य, शिल्पकला आणि ऐतिहासिक वारसा यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, ६० वर्षांवरील विद्यार्थ्यांनी उत्साहाने पायऱ्या चढून लेण्यांना भेट दिल्याने त्यांच्या सहभागाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.


