(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल गावच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. धनश्री दत्तात्रय मोरे यांना जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून प्रतिष्ठेचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
धनश्री मोरे यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९६० रोजी कारवली येथे झाला. गेली तब्बल ३५ वर्षे त्या राजापूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत दक्षता समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कोणत्याही वेळी, रात्र असो वा दिवस, अडचणीत सापडलेल्या महिलांच्या मदतीला धावून जाणे, गरजूंना आधार देणे आणि समाजातील वंचित घटकांसाठी निःस्वार्थपणे काम करणे ही त्यांची ओळख बनली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांना केवळ तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. कोविड काळात त्यांनी दाखवलेली सेवाभावाची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. त्या काळात रुग्णसेवेसाठी त्यांनी दिवस-रात्र कोविड सेंटरमध्ये उपस्थित राहून डॉक्टरांसोबत गरजू रुग्णांना मदत केली.
१९८५ साली अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी आपल्या सेवाकार्याची सुरुवात केली. पाचल येथील गुरववाडी येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर बाजारवाडी, कोंडवाडी अशा विविध ठिकाणी सेवा बजावत पुन्हा गुरववाडीत कार्यरत राहून ३० एप्रिल २०२६ रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या.
अंगणवाडी सेविकेच्या भूमिकेपलीकडे जाऊन त्यांनी अनेक सामाजिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. कायदेविषयक सल्ला समिती, रत्नागिरी आकाशवाणीवरील ‘गृहलक्ष्मी’ कार्यक्रमातून जनजागृती, ग्रामीण भागात प्रसूती सुविधांचा अभाव असताना विनामूल्य प्रसूती सेवा देणे, १९९७-९८ मध्ये जिल्हा नियोजन समितीवरील सदस्य म्हणून काम, तसेच रत्नागिरी जिल्हा कृती समिती (फलोद्यान) सदस्य, अन्न व नागरी पुरवठा विभागातील सदस्य म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.
याशिवाय राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका म्हणून तब्बल १८ वर्षे काम पाहिले असून उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. राजकीय क्षेत्रातही त्या सक्रिय राहिल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदावर त्यांनी काम केले आहे. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी निभावली आहे.
६६ व्या वर्षातही त्यांचा कार्याचा उत्साह तसाच कायम असून आजही त्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत २०२० ते २०२४ या कालावधीतील जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार महिलांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे.
या सन्मानामुळे पाचल गावासह संपूर्ण राजापूर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

