( राजापूर )
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत राजापूर शहरातील जलतरणपट्टूंनी आपला ठसा उमटवत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. हितेश शेलार, आदित्य हळदणकर आणि सार्थक वाघाटे या तिघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या कामगिरीचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.
गेली आठ वर्षे बंद असलेल्या मारुती मंदिराजवळील तळ्यावर सराव करून या जलतरणपट्टूंनी ही कर्तबगारी साधली आहे. राजापूर हायस्कूलचे शिक्षक कै. ए. जी. भावे यांनी या तळ्यावर मार्गदर्शन करून शेकडो जलतरणपट्टूंना घडवले होते. त्यांच्या शिष्यांनीच यावर्षी पुन्हा पुढाकार घेत तळे सरावासाठी खुले केले. सुरुवातीला पावसाच्या व्यत्ययामुळे तळ्यातील पाणी कमी झाल्याने अडचणी आल्या; मात्र कोदवली नदी, लांजा आणि रत्नागिरी येथील तलावांचा उपयोग करून सराव सातत्याने सुरू ठेवण्यात आला.
स्पर्धेत हितेश सचिन शेलार याने 50, 100 आणि 200 मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य महेश हळदणकर याने 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये द्वितीय, 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये तृतीय आणि 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तर सार्थक सचिन वाघाटे याने 100 आणि 200 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर प्रवेश केला.
या यशस्वी तिघा जलतरणपट्टूंसह त्यांचे प्रशिक्षक निकेत कुडाळी, निनाद सिर्सेकर, उदय खडपे, देवेंद्र शेट्ये, प्रतिक डांगवे, तन्मय मोदी, आशुतोष पेडणेकर, निलेश कुडाळी, दीपक कोदलकर आणि युवराज माने यांचेही अभिनंदन होत आहे.

