(मुंबई / वृत्तसंस्था)
देशातील सर्व बँकांना महिन्यातील पाचही शनिवारी सुट्टी जाहीर झाल्याचा दावा करणारा संदेश सध्या सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲपवर, मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारीही बँका बंद राहणार असल्याचे या संदेशात म्हटले आहे. मात्र, हा दावा चुकीचा असून बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत केंद्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी), नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे.
व्हायरल संदेशात भारतीय स्टेट बँकेसह (एसबीआय) देशातील सर्व बँकांना महिन्यातील प्रत्येक शनिवारी सुट्टी असणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात पीआयबीने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे खुलासा केला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले असून, सोशल मीडियावर प्रसारित होणारे संबंधित पत्रक बनावट असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच बँक कर्मचाऱ्यांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बँक कर्मचाऱ्यांकडून आठवड्यात पाच दिवसच कामकाज असावे, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीनुसार आठवड्यातील पाच दिवस आठ तासांपेक्षा अधिक काळ काम करण्याच्या मोबदल्यात शनिवारी सुट्टी देण्यात यावी, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी मांडली आहे. या मागणीसाठी २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान संप पुकारण्यात आला होता. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारीही बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, सरकारशी चर्चा झाल्यानंतर बँक कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक आश्वासने दिली असून, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन आणि बँक कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन केली जाणार आहे. आठवड्यात पाच दिवस कामकाज ठेवण्याच्या मागणीवर ही समिती विचार करणार आहे. यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करण्याची तयारीही दर्शवली आहे.
मात्र, सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्यात आला असला, तरी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत किंवा महिन्यातील सर्व शनिवारी सुट्टी देण्याबाबत अधिकृत निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे बँकांना सर्व शनिवारी सुट्टी असल्याचा दावा करणारा व्हायरल संदेश दिशाभूल करणारा आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.


