(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील श्री चंडिका मित्र मंडळ यांचे वतीने शिमगोत्सवानिमित्त भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक चार, पाच व सहा मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. ही स्पर्धा मालगुंड गावची ग्रामदैवता असलेल्या श्री चंडिका देवी मंदिराच्या नजीक असलेल्या राणे संकुल मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील मातब्बर कबड्डी संघ सहभागी होणार होणार आहेत. त्यामध्ये नामांकित व दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मालगुंड पंचक्रोशीतील क्रीडा रसिकांना उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेच्या जय्यत तयारीसाठी सध्या चंडिका मित्रमंडळाचे सर्व सदस्य मोठी मेहनत घेत आहेत. यापूर्वी सुद्धा या मंडळाने पहिल्या पर्वातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करून शिमगोत्सवानिमित्त कबड्डी प्रेमींना एक नवी पर्वणी दिली होती. त्यामुळे दुसऱ्या पर्वातील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंडिका मित्र मंडळ सज्ज झाले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक संघाने अधिक माहितीसाठी चंडिका मित्र मंडळाचे प्रमुख संयोजक शुभम साळवी, आदित्य लिंगायत, मंदार कळंबटे, रितेश लिंगायत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

