(चिपळूण / वार्ताहर)
नवी दिल्ली येथे ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांकडून कथितरीत्या गैरवर्तन झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनानुसार, ६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन परिसरात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वाबाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या घटनेनंतर प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांकडून कथित गैरवर्तन झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचे काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी राहुल गांधी यांच्याशी बोलताना पोलिसांकडून त्यांच्या कपड्यांबाबत गैरवर्तन होत असल्याच्या आशयाचे वक्तव्य करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता तसेच त्यामागील वस्तुस्थितीची स्वतंत्रपणे तपासणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
महिला लोकप्रतिनिधींशी कायदा अंमलबजावणी यंत्रणेकडून सन्मानपूर्वक आणि कायदेशीर पद्धतीने वर्तन होणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच शांततापूर्ण आंदोलन करणे आणि संविधानिक संस्थांकडे उत्तरदायित्वाची मागणी करणे हा नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा लोकशाहीतील अधिकार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, आंदोलनात सहभागी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे संरक्षण करावे, तसेच महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान, सुरक्षितता आणि मानवी प्रतिष्ठा अबाधित राहण्यासाठी स्पष्ट प्रशासकीय निर्देश द्यावेत, अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोनललक्ष्मी घाग यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ते संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, काँग्रेसचे नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोठे, मिस्बाह नाखुदा, काँग्रेसच्या महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्षा सौ. निर्मला जाधव, सिराज रखांगे, रियाज ठाकूर, मंगेश भैरवकर, लियाकत शेख, तुळशीराम पवार, संजय जाधव, अजित शिंदे, श्रीकांत मुंगशे, मोहम्मद पालेकर आदी उपस्थित होते.


