(देवळे / प्रकाश चाळके)
कमी पावसामुळे जमिनीतील पाणीसाठा कमी होऊ नये, तसेच पावसाचे पाणी अडवून त्याचे जमिनीत पुनर्भरण व्हावे, या उद्देशाने आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी आपल्या मतदारसंघातील गावागावांत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेंतर्गत बंधारे बांधण्याच्या कामाला गती दिली आहे. याच उपक्रमांतर्गत देवळे गावातही बंधारा बांधण्याचा संकल्प हाती घेण्यात आला असून, शिवसेना, युवासेना आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, दाभोळे जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते विलास भाई बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती सौ. शर्वरी वेल्ये यांच्या उपस्थितीत आणि युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या प्रोत्साहनातून बंधाऱ्याचे काम करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश चाळके, सामाजिक कार्यकर्ते दिनेश (बंड्या) परशेट्ये आणि देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष संजय काळोखे उपस्थित होते.


