(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून बेफाम वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्यावेळी मानसकोंड येथे एका सहा वर्षांच्या मादी सांबराला अशी चिरडले. या घटनेने काही क्षणांत तेथे रक्ताचा थारोळाच तयार झाला होता. महामार्गावर पसरलेल्या दाट धुक्यात वाहनचालकाला रस्ता नीट दिसला नसल्याने अचानक समोर आलेल्या सांबराला धडक बसल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. हा हृदयद्रावक अपघात पहाटे उघडकीस आला.
घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ निरपराध सांबराचे तडफडत असलेले हाल पाहून हळहळ व्यक्त करत होते. तात्काळ मानसकोंडचे पोलीस पाटील यांनी देवरुख वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडूकर आणि सहयोग कराडे यांनी धावत घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सांबराला अत्यंत काळजीपूर्वक उचलून देवरुख पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले.
पशुधन अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र सांबराच्या जखमा खोल आणि गंभीर असल्याने तज्ज्ञ उपचारांची आवश्यकता होती. यासाठी कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले असून, त्यांचे लांजा येथे पोहोचताच उच्चस्तरीय उपचार सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सांबराला लांजाकडे हलवण्यात आल्याची माहिती वनपालांनी दिली.
याच परिसरात काही दिवसांपूर्वी कारंजरी येथेही एका सांबराचा वाहनधडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा अशी दुर्घटना घडल्याने नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावरील बेफाम वेग, दाट धुके आणि वन्यजीवांचे वाढते मृत्यूपात याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
“जंगलातील प्राणी रस्ता ओलांडतात म्हणून ते दोषी नाहीत. वेगवान वाहने, बेफाम ड्रायव्हिंग आणि रात्रीचे धुके यामुळे शेवटी जीव जातो तो या मुक्या प्राण्यांचा!” अशी प्रतिक्रिया प्राणीप्रेमींनी यावेळी व्यक्त केली. या घटनेने पुन्हा एकदा महामार्गांवरील वन्यजीव संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आहे.

